एका वर्षात नरेंद्र मोदींची लोकप्रियता ६६ हून २४ टक्क्यांपर्यंत घसरली; अमित शाह, योगी, राहुल गांधी 'फेमस'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:12 PM2021-08-17T15:12:17+5:302021-08-17T15:26:11+5:30
India Today Mood of Nation Survey: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती.
नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून जगात तसेच देशात कोरोना महामारीमुळं संकट उभं राहिलं आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या विविध घटनांमध्ये एका इंग्लिश चॅनेलनं घेतलेल्या सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.
इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलच्या सर्व्हेतून हे समोर आलं आहे. या सर्व्हेत विचारण्यात आलं होतं की, भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? यावर ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. तर जानेवारी २०२१ मध्ये याच प्रश्नाला ३८ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती. तर मागील ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. भाजपाचे फायर ब्रँड नेते असतानाही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली असली तरी भाजपाशी संबंधित दोन बड्या नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
पोलनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या नावाला ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा १० टक्के इतका होता तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ ३ टक्के लोकांनीच योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली होती. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये केवळ ४ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी अमित शहांच्या नावाला पसंती दिली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं पाहिली तर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. तर पश्चिम बंगालच्या आक्रमक नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हावं यासाठी पसंती दर्शवली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ४ टक्के झाला तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के झाला आहे.
या पोलनुसार, राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांच्या लोकप्रियतेत किंचित वाढ झाली आहे. तर सोनिया गांधी यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २ टक्के लोकांनी प्रियंका गांधींच्या नावाला संमती दिली. तर ऑगस्ट २०२१ मध्ये ४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. Mood of the Nation August 2021 हा सर्व्हे १० जुलै ते २० जुलै यादरम्यान करण्यात आला आहे. या पोलमध्ये देशातील १९ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघ आणि २३० विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.