नवी दिल्ली - पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपलं जम्मू-काश्मीर. देशाच्या सीमारेषेवरील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश सुंदरतेमुळे आणि दहशतवादी कारवायांमुळेही कायम चर्चेत असतो. याच जम्मू काश्मीरमध्ये सचिन तेंडुलकर सहकुटुंब फिरायला गेला आहे. त्यावेळी, काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा, बर्फात कुटुंबासमवेत मजा-मस्ती करण्याचा आणि येथील विविध ठिकाणांना भेटी देण्याचा पर्यटक आनंद सचिनने लुटला आहे. विशेष म्हणजे आपल्या काश्मीर दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सचिनने काश्मीरच्या सौंदर्याचंही कौतुक केलंय.
मास्टरब्लास्टर सचिनचा जम्मू-काश्मीर दौरा सोशल मीडियातही चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती, तर दुसरीकडे निवडणुकां जवळ आल्या असताना सचिनने केलेला काश्मीर दौरा सोशल मीडियात वेगवेगळ्या मुद्द्यांनी चर्चेत आहे. त्यावरुन, नेटीझन्स चर्चा करत आहेत. त्यातच, सचिनने काश्मीरच्या सौंदर्याचं वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेन्शन करुन काश्मीरमधील मेक इन इंडियाचंही कौतुक केलं आहे. त्यानंतर, स्वत: पंतप्रधान मोदींनी सचिनच्या ट्विटला रिप्लाय देऊन आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी एकत्र येण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे.
जम्मू आणि काश्मीर हा माझ्या आठवणीत कोरलेला सुंदर अनुभव राहील. माझ्या आजूबाजूला बर्फ होता, पण लोकांच्या अतिशय प्रेमळ पाहुणचारामुळे आम्हाला इथेही उबदार वाटले, असे ट्विट सचिनने केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, आपल्या देशात पाहण्यासारखे बरेच काही आहे. विशेषतः या सहलीनंतर मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे सचिनने म्हटले होते. येतील काश्मीर विलो बॅट हे ''मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड'' चे उत्तम उदाहरण आहे. येथील बॅट्सने जगभराचा प्रवास केला आहे. आता, जगभरातील लोकांना आणि भारताला जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनाचा अनुभव घेण्याचं आवाहन करतो, जे जम्मू-काश्मीर अनेक रत्नांपैकी एक आहे, असे ट्विट सचिनने केले आहे. सचिनच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिप्लाय दिला आहे.
हे पाहणे अद्भूत आहे!
सचिन तेंडुलकर यांच्या प्रेमळ जम्मू आणि काश्मीरच्या भेटीमध्ये आपल्या देशातील तरुणांसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक - देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन अतुल्य भारतचा शोध घेणे. तर, दुसरे - ‘मेक इन इंडिया’चे महत्त्व... असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, चला, एकऊ येत विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करूया, असे मोदींनी म्हटले आहे.
सचिन रस्त्यावर क्रिकेट खेळला, आमीरला भेटला
सचिनने काश्मीर दौऱ्यात पहिल्याच दिवशी तेथील तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन येथील क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. तर, मागील महिन्यात सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसैन लोनचा ( Amir Hussain Lone ) व्हिडिओ शेअर केला होता. २०० कसोटी, ४६३ वन डे व १ ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिननेही या क्रिकेटपटूला भेटण्याची आणि त्याच्या नावाची जर्सी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, सचिनने काश्मीर दौऱ्यावर आमिरची भेट घेतली. त्याने इंस्टाग्रामवर आमीरसोबतच्या संवादाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, “आमिरला, खरा हिरो. प्रेरणा देत रहा! तुम्हाला भेटून आनंद झाला. ”, असे म्हटले.