सिलीगुडी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारत एक मोठा देश आहे. देशाची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे. तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी वारंवार का करता? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला आहे. सिलीगुडी येथील रॅलीत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करता? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात. प्रत्येक मुद्द्यात पाकिस्तानचा उल्लेख करत असतात. केंद्र सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एनआरसी प्रक्रिया पुढे आणली आहे. भाजपा नेत्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे पंतप्रधान सांगतात एनआरसी लागू केली जाणार नाही तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा दावा करतात की, संपूर्ण देशभरात एनआरसी प्रक्रिया लागू करणार आहे. पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे म्हणून वारंवार पाकिस्तानच्या गोष्टी बोलण्याची गरज त्यांना भासते असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.