नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले, पाहा-
- नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घ्या
- भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत कामगिरी करत आहे.
- नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे.
- व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे.
- लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.
- आतापर्यंत १४१ कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे.
- भारताची आर्थिक स्थितीही उत्साहजनक आहे. पण कोरोना अजूनही गेलेला नसल्याने काळजी महत्त्वाचं आहे.
- देशातील ६१ टक्के नागरिकांचं दोन डोस पूर्ण.
- मास्कचा जास्तीत जास्त वापर करा.
- जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे.
- ओमायक्रोनला घाबरू नका, काळजी घ्या.
- ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष आहे.
- देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी १ लाख ४० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे
- १० जानेवारी २०२२ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरच्या सल्ल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येईल.
- ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार.