जम्मू-काश्मीरमध्ये २५ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथील रॅलीला संबोधित केलं. याच दरम्यान मोदींनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेस पक्षाच्या राजघराण्याचे जे वारस आहेत त्यांनी परदेशात जाऊन काय म्हटलं ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. ते म्हणतात की, आमचे देवी-देवता 'देव' नाहीत... हिंदू धर्मात प्रत्येक गावात देवांची पूजा करण्याची परंपरा आहे."
"आम्ही देव आहे हे मानणारे लोक आहोत आणि हे काँग्रेसचे लोक म्हणतात की, देव नाही, हा आमच्या देवांचा अपमान नाही का? काही मतांसाठी काँग्रेस आमची श्रद्धा आणि आमची संस्कृती कधीही पणाला लावू शकते." राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील विधानाचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, "काँग्रेसचे लोक चुकून अशा गोष्टी बोलत नाहीत, तर ही जाणीवपूर्वक केलेली त्यांची चाल आहे."
"ही नक्षलवादी विचारसरणी आहे आणि इतर देशांतून आयात केलेली विचारसरणी आहे. काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या घराणेशाहीने या क्षेत्रावर वर्षानुवर्षे घाव केले, जखम दिली. अशा लोकांच्या राजकारणाचा तुम्हाला अस्त करावा लागेल. त्यासाठी कमळ हे बटण निवडावं लागेल. हा भाजपा आहे जो तुमच्या हिताला प्राधान्य देतो."
"अनेक दशकांपासून तुमच्या विरोधात सुरू असलेला भेदभाव भाजपानेच संपवला आहे. काँग्रेस नेत्याने जाणूनबुजून हा हल्लाबोल केला आहे. मोहब्बत की दुकान म्हणत द्वेषाचं सामान विकण्याची ही त्यांची जुनी नीती आहे. त्यांना व्होट बँकेशिवाय काहीही दिसत नाही. हे भारतातील भ्रष्टाचाराचे जन्मदाते आहेत" असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.