Narendra Modi Hoshangabad Rally: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, विरोधक सातत्याने, मोदी सरकारकडून देशाला धोका आहे. मोदी सरकार संविधान बदलणार, अशाप्रकारच्या टीका होतात. आता या सर्व टीकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. तसेच, विरोधकांना थेट सल्लाही दिला.
मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यावर आग लागेल, असे काँग्रेसवाले म्हणतात. 2014 आणि 2019 मध्येही ते अशाच प्रकारची टीका करायचे. पण, आतापर्यंत कधी देशात आग लागली का? राम मंदिराबाबतही ते हेच बोलायचे, पण यामुळे आग लागली का? आग देशात नाही, तर त्यांच्या मनात लागली आहे. ही ईर्षा त्यांच्या मनात इतकी तीव्र झाली आहे की, त्यांना आतून जाळत आहे. ही ईर्षा मोदींमुळे नाही, तर 140 कोटी नागरिकांच्या मोदींवरील प्रेमामुळे आहे. त्यांना हे प्रेमही सहन होत नाही, अशी टीका मोदींनी केली.
इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर म्हणाले...तुम्ही इंडिया आघाडीची स्थिती पाहा. जाहीरनामा एक जबाबदारी आहे, देशातील जनतेशी बांधिलकी आहे. त्यांना काय करायचे आहे, कसे करायचे? हेदेखील त्यांच्या बोलण्यात कुठेच दिसत नाही. त्यांच्या एका सहकाऱ्याने जाहीरनाम्यात म्हटले की, आम्ही देशातून अण्वस्त्रे नष्ट करू. कोणताही देश असा विचार करेल का? यावरुनच, ते देशाच्या हिताचा विचार करू शकतात का? असा प्रश्न पडतो. त्यांचा विचार जितका घातक आहे, तितकाच त्यांचा जाहीरनामाही धोकादायक आहे, असा घणाघात मोदींनी केली.
घराणेशाहीच्या राजकारणावर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेसच्या एकाच कुटुंबाने थेट किंवा रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. या कुटुंबाने देशात आणीबाणी लागू केली. काँग्रेसने पत्त्याच्या घराप्रमाणे देशभरातील लोकशाही सरकारे पाडली. काँग्रेसने आपल्या इच्छेनुसार इतिहासाचे विकृतीकरण करुन हवे ते मिळवले. काँग्रेसचे मानायचे झाले तर, त्या काळात लोकशाही चांगली चालली होती आणि बहरत होती. मात्र गरीब कुटुंबातील मुलगा पंतप्रधान होताच काँग्रेसने संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल, अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांना माहीत नसेल, पण बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी इथपर्यंत पोहोचले.