Narendra Modi : "गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:27 PM2024-04-15T20:27:24+5:302024-04-15T20:35:10+5:30
Narendra Modi And Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान तिसऱ्या टर्मच्या तयारीबाबत सांगितलं. यावेळी त्यांनी देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपासून ते देशातील करदात्यांपर्यंत सर्व गोष्टींबाबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीदरम्यान तिसऱ्या टर्मच्या तयारीबाबत सांगितलं. यावेळी त्यांनी देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपासून ते देशातील करदात्यांपर्यंत सर्व गोष्टींबाबत चर्चा केली. जगातील मोठ्या कंपन्यांनी देशात केलेली गुंतवणूक आणि त्यातून होणारे फायदे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, "भारतात पैसा कोणत्याही देशाचा असो, पण कष्ट, घाम हा देशातील तरुणांचा असला पाहिजे. गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही."
एएनआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात होणारी गुंतवणूक आणि गुगलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त केला आणि यादरम्यान त्यांनी इलॉन मस्क यांच्या भेटीचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, "इलॉन मस्क हे भारताचे चाहते आहेत, 2015 मध्ये मी त्यांची फॅक्टरी पाहायला गेलो होतो आणि त्यांनी स्वतः त्यांची फॅक्टरी दाखवली होती, आता ते भारतात येत आहेत."
ईव्ही मार्केटचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, "इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठा बदल झाला आहे. 2014-15 मध्ये फक्त 2000 इलेक्ट्रिक वाहने विकली गेली, तर 2023-24 मध्ये 12 लाख इलेक्ट्रिक वाहने विकली गेली. चार्जिंग स्टेशनचं मोठं नेटवर्क तयार केलं आहे आणि आम्ही या क्षेत्रासाठी एक धोरण तयार केलं आहे आणि ते जगाला सांगितले आहे, ज्याचा परिणाम भारतातील बाह्य गुंतवणुकीच्या रूपात दिसून येत आहे."
Elon Musk is supporter of Modi is one thing, basically, he is a supporter of India...I want investment in India. Paisa kisi ka bhi laga ho, paseena mere desh ka lagna chahiye, uske andar sugandh mere desh ki mitti ki aani chahiye, taaki mere desh ke naujawan ko rozgar mile… pic.twitter.com/1iD6W8gY2w
— ANI (@ANI) April 15, 2024
"आज आपण प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, पण पैसा कोणाचाही असो... घाम, कष्ट देशाचे असले पाहिजेत. आपल्या देशातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मी असं काही करेन ते माझ्या देशासाठी, माझ्या देशातील तरुणांसाठी करेन. मी असंही करत आहे. भारतीय तरुणांना देशातच रोजगार मिळावा अशी माझी इच्छा आहे" असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
पीएम मोदींनी विकसित भारताच्या व्हिजनबद्दलही सांगितलं आणि ते देशातील तरुणांशी जोडलेले असल्याचे वर्णन केलं. ते म्हणाले की आजच्या 20-22 वर्षांच्या तरुणांचे भविष्य मी विकसित भारत आणि 2047 च्या व्हिजनबद्दल जे बोलतो त्याच्याशी जोडलेलं आहे. आजचा पहिला मतदार 2047 चा सर्वात मोठा लाभार्थी ठरणार आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे अर्थव्यवस्थेचे अपयश असल्याचं सांगून विरोधकांचा जाहीरनामा तरुणांचं भवितव्य पायदळी तुडवणारा असल्याचं सांगितलं.
मोदींनी आपल्या कार्यकाळातील गेल्या 10 वर्षातील कामगिरीची आकडेवारी सांगितली. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दशकात आयटीआर भरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये 4 कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले होते आणि आज ही संख्या 8 कोटींहून अधिक झाली आहे. आयटीआर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याने या कालावधीत कर संकलनात 3 पट वाढ झाली आहे. यापूर्वी 11 लाख कोटी नेट टॅक्स कलेक्शन होतं आणि आता 34 लाख कोटी रुपये असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.