SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत व्हर्च्युअलसी सामील झाले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, गेल्या दोन दशकांमध्ये एससीओ आशियात समृद्धी, शांतता आणि विकासासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. या समिटमध्ये पीएम मोदींनी दहशतवादावरुन नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला.
SCO शिखर परिषदेच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही यात सहभाग घेतला होता. सर्वजण व्हर्च्युअली बैठकीत सामील झाले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आम्ही एससीओला शेजाऱ्यांसोबतची बैठक नाही, तर एका कुटुंबाची बैठक म्हणून पाहतो. सुरक्षा, आर्थिक विकास, कनेक्टिव्हिटी, एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि पर्यावरण संरक्षण हे SCO चे आधारस्तंभ आहेत.
पाकिस्तानला सुनावलंपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पीएम मोदींनी दहशतवादावरही चर्चा केली. ते म्हणाले की, दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेला धोका आहे. दहशतवादाविरुद्ध एकत्र लढावं लागेल. पाकिस्तानचे नाव न घेता पीएम मोदी म्हणाले की, काही देश सीमेपलीकडे दहशतवादाचा वापर त्यांच्या धोरणांप्रमाणे करत आहेत. असे देश दहशतवाद्यांना आश्रय देतात. एससीओने अशा देशांवर टीका करणे टाळू नये. SCO देशांनी दहशतवादावर टीका केली पाहिजे. दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पीपणा होता कामा नये.
अफगाणिस्तानला मदत करावी लागेलअफगाणिस्तानातील परिस्थितीवरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले. अफगाणिस्तानबाबत भारताच्या चिंता आणि अपेक्षा इतर SCO देशांसारख्याच आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध शतकांपूर्वीचे आहेत. भारताने दोन दशकांपासून अफगाणिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी योगदान दिले आहे. 2021 मध्ये ज्या प्रकारचा घडामोडी घडल्या, त्यानंतरही भारताकडून सातत्याने मानवतावादी मदत पाठवली जात आहे.