मोदीजी 'मन की बात' मध्ये नीरव मोदी आणि राफेल डीलविषयी बोला- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 03:54 PM2018-02-22T15:54:50+5:302018-02-22T15:55:00+5:30
नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले?
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या आगामी भागात नीरव मोदी आणि राफेल व्यवहाराविषयी बोलावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले की, मोदीजी गेल्या महिन्यात 'मन की बात'साठी मी सुचविलेल्या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला तुमच्याकडून काय ऐकायचे आहे, हे तुम्हाला उमगलेच असेल. तेव्हा 'मन की बात'साठी इतरांकडून सूचना मागवण्याची गरजच काय, असा सवाल राहुल यांनी विचारला.
नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले? ५८ हजार कोटी रुपयांचा राफेल विमान खरेदी व्यवहार या दोन मुद्द्यांवर तुम्ही बोललेच पाहिजे. मी तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींना सातत्याने लक्ष्य करत आहेत. यापूर्वी राहुल यांनी जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. तसेच मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ्यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. असे वागणे बंद करा, अशी सूचना राहुल यांनी केली होती.
Modi Ji, last month you ignored my suggestions for your Mann Ki Baat monologue.
— Office of RG (@OfficeOfRG) February 21, 2018
Why ask for ideas when in your heart you know what every Indian wants to hear you speak about?
1. Nirav Modi's 22,000 Cr. Loot & Scoot
2. The 58,000 Cr. RAFALE scam.
I look forward to your sermon. pic.twitter.com/jp0AnLePtU
राहुल गांधी २४ फेब्रुवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने त्यांनी तीनदिवसीय दौरा आखला आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाडमध्ये जाणार आहेत. त्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल बसने प्रवास करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राहुल गांधी मंदिर, दर्ग्यावरही जातील.