रायबरेली : आपण अजिंक्य आहोत, असा गैरसमज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून घेऊ नये, असा सल्ला देत पाच वर्षांत त्यांनी एकही आश्वासन पाळले नसल्याची टीका संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.
सोनिया गांधी यांनी गुरुवारी येथे रोड शोद्वारे शक्तिप्रदर्शन करून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी येथील काँग्रेस कार्यालयात हवनही केले. त्या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या.अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीमध्ये सोनिया यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी आपण स्वत: अजिंक्य आहोत, असे समजतात. देशापेक्षाही आपण मोठे आहोत, असे त्यांना वाटते, त्यांच्यासारखेच अनेक जणांनाही तसेच वाटते. परंतु २00४चा इतिहास त्यांनी विसरू नये. अटल बिहारी वाजपेयी यांनाही असेच वाटत होते, परंतु जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिले होते, याची आठवण ठेवावी.
या वेळी राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका करून खुली चर्चा करण्यासाठी सामोरे यावे, असे आव्हान दिले. निकालाच्या दिवशी देशातले चित्र बदललेले असेल, असाही विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनिया गांधी व राहुल यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. (वृत्तसंस्था)९ मे रोजी मतदानया मतदारसंघात ९ मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. सोनिया यांची लढत काँग्रेस सोडून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी होत आहे. मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आघाडीने उमेदवार दिलेला नाही.