Narendra Modi slams oppositon: लोकसभा निवडणूक अवघा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळेच देशातील राजकीय वाचावरण चांगलेच तापले आहे. अशातच, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे. एक विशेष गट देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात गुंतला असल्याचे या पत्रात म्हटले. आता यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
देशातील 600 हून अधिक वकिलांनी CJI ला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'एक विशेष गट देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचे काम करत आहे. राजकीय प्रकरणांमध्ये, विशेषत: राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या प्रकरणांमध्ये दबाव आणला जातोय. हे आपल्या देशाच्या न्यायपालिकेसाठी हानिकारक आणि आपल्या लोकशाहीसाठी धोका आहे. हा विशेष गट न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो.'
'हा गट एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि नंतर त्याचाच बचाव करतो. हा गट न्यायालयाच्या चांगल्या भूतकाळाच्या आणि सुवर्णकाळाच्या खोट्या कथा रचतो आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांशी तुलना करतो. त्यांच्या टिप्पण्यांचा उद्देश न्यायालयांवर प्रभाव पाडणे आणि राजकीय फायद्यासाठी त्यांना अस्वस्थ करणे हा आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही, तर न्यायालयावर टीका केली जाते' असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, 'दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. 5 दशकांपूर्वी त्यांनी प्रतिबद्ध न्यायपालिकेची मागणी केली होती. ते निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धता घेतात, देशाप्रती कोणतीही वचनबद्धता ठेवत नाहीत. 140 कोटी भारतीय त्यांना नाकारत आहेत, यात काहीच आश्चर्य नाही,' अशी टीका पीएम मोदी यांनी केली.