तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि DMK वर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी 'शक्ती' वरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, इंडिया आघाडी वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अपमान करत आहे. काँग्रेस आणि डीएमके यांना हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय आहे. हिंदू धर्माविरुद्ध त्यांनी केलेले प्रत्येक विधान अतिशय विचारपूर्वक केले जाते.
इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांवर जोरदार निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तुम्ही बघा, डीएमके आणि काँग्रेसची इंडिया आघाडी इतर कोणत्याही धर्माचा अपमान करत नाही. ते इतर कोणत्याही धर्माविरुद्ध एक शब्दही उच्चारत नाहीत, पण हिंदू धर्माला शिव्या देण्यात एक सेकंदही वाया घालवत नाहीत."
"आमचं शास्त्र साक्ष देतं की जे लोक शक्ती संपवण्याचा विचार करतात त्यांचा विनाश होतो. 19 एप्रिल रोजी अशा धोकादायक विचारांना हरवण्याची सुरुवात पहिला माझा तामिळनाडू करेल. निवडणुकीचा प्रचार नुकताच सुरू झाला आहे."
"मुंबईत झालेल्या पहिल्या सभेत इंडिया आघाडीच्या योजना उघड झाल्या आहेत. हिंदू धर्माची ज्या शक्तिवर आस्था आहे. त्या शक्तीचा विनाश करायचा असल्याचं ते म्हणत आहेत. हिंदू धर्मात शक्ती कशाला म्हणतात हे तमिळनाडूतील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. आता तामिळनाडूने ठरवलं आहे की 19 एप्रिलला प्रत्येक मत भाजपा आणि एनडीएकडे जाईल. अबकी बार 400 पार हे आता तामिळनाडूने ठरवलं आहे."
देशातील महिला शक्तीच्या प्रत्येक समस्येसमोर मोदी ढाल बनून उभे आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांना धूरमुक्त जीवन देण्यासाठी आम्ही उज्ज्वला एलपीजी गॅस कनेक्शन दिले आहेत, मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान योजना सुरू केली आहे. या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी नारीशक्ती असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.