- संजय शर्मा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत.
सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले आहे. परंतु, राजकीय अपरिहार्यतेमुळे - मंत्रिमंडळातील चेहरे बदलावे लागतात. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे काही जणांना हटवावे लागू शकते. हटविण्यात आलेल्या मंत्र्यांनी नाराज होऊ नये. ही एक राजकीय प्रक्रिया आहे, असे पंतप्रधान सांगणार आहेत.
सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या अंतिम फेरबदलापूर्वी मोदी यांनी ३ जुलैला दुपारी तीन वाजता मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मोदी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मोदी मंत्रिमंडळातील सुमारे १२ मंत्र्यांना हटवले जाऊ शकते. त्यामुळे बैठकीचे महत्त्व वाढले आहे.
काय देणार गुरुमंत्रआजवर मंत्री परिषदेच्या जेवढ्या बैठका झाल्या, त्यात महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण संबंधित मंत्रालयाच्या मंत्र्यांकडून केले जात होते, ते सादरीकरण पाहून पंतप्रधान त्यांना सल्ला देत होते व इतर मंत्रालयांनाही त्याचप्रकारे सादरीकरणावर काम करण्याचे निर्देश देत होते, परंतु, तीन जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांना लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी गरीब, शोषित, वंचित व मागास वर्गामध्ये जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची त्यांना माहिती देण्याचा गुरुमंत्र देणार आहेत.