पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षीही मीच देशाची प्रगती सांगणार असे सुतोवाच केले. याचबरोबर मोदींनी जनतेला मोदींच्या तीन कमिटमेंटची माहिती दिली.
मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाला ओरबाड़लेय. जखडून ठेवले आहे. याने देशाच्या लोकांचा हक्क हिरावला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, तुष्टीकरणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. ही मोदींची कमिटमेंट आहे, असे मोदी यांनी सांगितले.
आपल्याला तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. हे आव्हान आपल्या देशाचे, जनतेचे शोषण करत आहेत. गरीब परंतू कौशल्य असलेल्या लोकांची संधी हिरावून घेत आहेत, असे मोदी म्हणाले. देशात १० कोटी लोकांचा जन्मच झाला नव्हता, त्यांच्या पत्नी विधवा होत होत्या. मुले होत होती. हे लोक देशाचा खजिना लुटत होते. ते मी बंद केले. यामुळे मोदी या लोकांना नको झालाय, अशी टीका मोदी यांनी केली.
परिवारवाद आणि घराणेशाही हे सामाजिक न्यायाच्या प्रतिभेचे शत्रू आहेत, ते गरीबांची क्षमता नाकारतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच या देशातील लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. सर्वजन हिताचा आणि सर्वजन सुखाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. त्यामुळे सामाजिक न्यायाचीही गरज आहे. तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. कोणी सामाजिक न्याय नष्ट केला असेल, तर या तुष्टीकरणाच्या विचारसरणीने, तुष्टीकरणाच्या राजकारणाने, तुष्टीकरणाच्या योजनांनी सामाजिक न्यायाचा घात केला आहे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले.
सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. शेती, उद्योजकतेचे ट्रेनिंग दिले जाईल. ७०० जिल्ह्यांमध्ये 5G पोहोचले आहे. आता 6G ची तय़ारी सुरु केली आहे. हा भारत थांबत नाही, हा भारत खचून जात नाही, हा भारत दमत नाही आणि हा भारत हार मानत नाही, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.