लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भापजपाला बहुमताने हुलकावणी दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत होते. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सभागृहामधून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आज मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंगवण्यात व्यस्त आहे, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.
लोकसेभमध्ये संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या. सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसने आपला पराभव स्वीकार करून, जनादेश मान्य करून आत्मचिंतन केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र सध्या त्यांच्याकडून शीर्षासन घालण्याचे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झालाय, अस चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला मोदींनी लगावला.
नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, १९८४ नंतर आतापर्यंत १० लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र त्यामध्ये एकदाही काँग्रेसला २५० जागाही जिंकता आलेल्या नाही. यावेळी काँग्रेसवाले ९९ जागांच्या फेऱ्यात अडकले. एक मुलगा ९९ गुण दाखवून मिठाई वाटत फिरत होता. लोकही शाबासकी द्यायचे. मात्र जेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांनी याला १०० पैकी ९९ नाही तर ५४३ पैकी ९९ गुण मिळाले आहेत, असं सांगितलं, अशा शब्दात मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा समाचार घेतला.