ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 28 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तान तपास पथकाला भारतात येण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. एकीकडे पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादी कारवाया करत असताना त्यांनीच केलेल्या हल्याचा तपास करण्यासाठी त्यांच्या लोकांना आपल्या देशात येण्याची परवानगी कशी काय देऊ शकतो ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानी तपास यंत्रणा आयएसआयला बोलवून मोदी सरकारने पाकिस्तानसमोर गुडघे टेकले आहेत. मोदी सरकारने शहीदांचा अपमान केला आहे. भारतातील लोक हे सहन करणार नसल्याचं केजरीवाल यांनी ट्विटरमध्ये म्हंटलं आहे.
आयएसआय या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचं आम्ही सुरुवातीपासून म्हंटलं आहे. हा हल्ला पाकिस्ताननेच केला आहे. आता मोदी सरकारची भुमिका बदलली आहे का ? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. पठाणकोट दहशतवाही हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारतात आलं आहे. 2 जानेवारीला झालेल्या या हल्ल्यात 7 सुरक्षाजवान शहीद झाले होते.
ISI को बुलाकर मोदी सरकार ने पाक के आगे घुटने टेके। मोदी सरकार ने शहीदों की शहादत की सौदेबाज़ी की है।भारत के लोग ये क़तई बर्दाश्त नहीं करेंगे— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 28, 2016