'मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं...' हा २६ मे २०१४ रोजी घुमलेला आवाज आज बरोब्बर ५ वर्षं ४ दिवसांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून देशभरात घुमला आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे ६ हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. परंतु, यावेळी SAARC ऐवजी BIMSTEC संघटनेतील राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून मोदींनी पाकिस्तानला सीमेपार ठेवून आपले इरादे स्पष्ट केले. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचे प्रमुख या सोहळ्याचे साक्षीदार झाले.