नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद सााधला. जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्यांनी साधलेला हा पहिलाच उच्चस्तरीय संवाद होय. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता मोदी म्हणाले की, पाकिस्तानमधील नेते भारताविरुद्ध करीत असलेली चिथावणीखोर विधाने आशियाच्या शांततेसाठी अनुकूल नाहीत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी व्हावा, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी ३० मिनिटांच्या या चर्चेदरम्यान व्यक्त केली.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यात आल्यापासून पाकिस्तानमधील काही नेते मोदी सरकार आणि भारताच्या निर्णयाविरुद्ध चिथावणीखोर टिप्पणी करीत आहेत. या कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांमध्ये सौहादपूर्ण चर्चा झाली.
दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण करणे, तसेच सीमापार दहशतवाद रोखण्याचे महत्त्व पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. गरिबी, निरक्षरता आणि रोगराईविरुद्ध लढा देण्यासाठी हा मार्ग पत्करणाऱ्या कोणाशीही भारत सहकार्य करण्यास बांधील आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्याशी इम्रान खान यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. काश्मीर प्रश्न भारताशी द्विपक्षीय मार्गाने सोडवावा, असे ट्रम्प यांनी त्यांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)