सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, शिवमोगा विधानसभा जागेबाबत राजकीय वातावरण तापले आहे. या जागेवर भाजपने माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या मुलाला तिकीट दिले नाही. तर त्याऐवजी दुसरा उमेदवार रिंगणात उभा केला आहे. यावर के. एस. ईश्वरप्पा यांनी नाराजी व्यक्ती केली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढाकार घेतला आणि शुक्रवारी के. एस. ईश्वरप्पा यांना फोन केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची तसेच पक्षाची विचारपूस केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी के. एस. ईश्वरप्पा यांनी पंतप्रधानांना भाजपच्या विजयासाठी एकत्र काम करू असे आश्वासन दिले आहे. तसेच, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे के. एस. ईश्वरप्पा यांनी पंतप्रधानांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर के. एस. ईश्वरप्पा म्हणाले की, मला पंतप्रधानांकडून फोन येण्याची अपेक्षा नव्हती. त्यांच्या या आवाहनामुळे शिवमोग्गा जागा जिंकण्याची प्रेरणा मिळाली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार परत आणण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. दरम्यान, सत्ताधारी भाजपने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के. एस. ईश्वरप्पा यांना फोन केला.
शिवमोग्गा मतदारसंघातून चन्नाबसप्पा यांना तिकीट देण्यात आले आहे, तर विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ भाजप नेते के.एस. ईश्वरप्पा यांचे पुत्र के. ई. कांतेश यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवमोग्गा येथून पाच वेळा आमदार राहिलेल्या के. एस. ईश्वरप्पा यांनी आगामी निवडणुकीसाठी आपला मुलगा के. ई. कांतेश यांना याच मतदारसंघातून तिकीट मागितले होते. कारण, त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती.