संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी मोदींनी कालच्या राहुल गांधींच्या अदानींवरील भाषणाचा खरपूस समाचार घेतला.
जेव्हा अणुकराराची चर्चा होत होती, तेव्हा हे नोट फॉर व्होटमध्ये गुंतले होते. टूजी, कोळसा घोटाळ्यांमुळे देशाची जगात बदनामी झाली. 2004 ते 2014 या दशकात देशाचे खूप नुकसान झाले आहे असे मोदी म्हणाले.
आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. काही लोकांना ते स्वीकारता येत नाही. रिन्यूएबल एनर्जीमध्ये चौथा सर्वात मोठा देश, मोबाईल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, आज खेळाडू आपला दर्जा दाखवत आहेत. भारताचा डंका जगात वाजत आहे. भारत हे उत्पादनाचे केंद्र बनले आहे, परंतू ते या लोकांना पाहवत नाहीय असा आरोप मोदी यांनी केला.
काही लोकांना हार्वर्ड स्टडीची मोठी क्रेझ आहे. हार्वर्डमध्ये अभ्यास होणार असल्याचे एका नेत्याने सांगितले होते. तिथे स्टडी झाला आहे. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे, असे म्हणत मोदींनी कवितेतून काँग्रेस नेत्यांवर बाण चालविले. यावेळी मोदींनी दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या ओळी ऐकविल्या. 'तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं...' असे मोदी म्हणाले.
भारत कमकुवत झाला आहे की मजबूत झाला आहे हे विरोधकांनी आधी ठरवावे. ते म्हणतात की देश कमकुवत झाला आहे. मग ते म्हणतात की भारत इतर देशांवर दबाव आणून निर्णय घेत आहे. आजही लोक अहंकारात जगत आहेत. मोदींना शिव्या देऊनच मार्ग सापडेल, असे त्यांना वाटते. जनता तुमचा बेछूट आरोप कसा मान्य करेल. त्यांच्या शिव्यांना देशाच्या १४० कोटी लोकांमधून जावे लागेल. जनतेच्या आशीर्वादाच्या संरक्षणात्मक कवचाचा भेद तुम्ही खोट्याच्या शस्त्राने कधीच करू शकणार नाही. तुम्ही कुटुंबासाठी जगता, मोदी 140 कोटी लोकांसाठी जगतोय, अशा शब्दांत मोदी यांनी आपण जनतेच्या मनात असेच उतरलो नाहीय हे सांगितले.