अहमदाबाद - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा गुढ पाडव्याच्या सभेत उचलून धरला आहे. विशेष म्हणजे हे भोंगे न उतरल्यास आम्हीही स्पीकर लावून तितक्याच जोराने हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे, सध्या राज्यासह देशात हनुमान चालिसा आणि भोंगा हा मुद्दा विशेष चर्चिला जात आहे. त्यातच, आज हनुमान जंयतीच्या मुहू्र्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते गुजरातच्या मोरबी येथे प्रभू हनुमान यांच्या 108 फुटी मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी, मोदींनी हा पुतळा नसून एक भारत श्रेष्ठ भारतचा संकल्प असल्याचे म्हटले.
'हनुमानजी चार धाम' योजनेंतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये भव्य हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. त्यापैकी, गुजरातच्या मोरबी येथे लोकार्पण करण्यात येत असलेली ही दुसरी मूर्ती आहे. पश्चिम भागातील मोरबी येथे परमपूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. योजनेतील पहिली मूर्ती उत्तर भागात सन 2010 मध्ये शिमला येथे स्थापन करण्यात आली होती. दक्षिण भागात रामेश्वरम येथे सध्या मूर्तीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आलं आहे.
हनुमान जयंतीचे महत्त्व
हिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना (chaitra month) खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी(ram navami) असते. तसेच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र शुक्ल पौर्णिमा हा हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात.