लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यासाठी २० किलो आरडीएक्ससोबत २० स्लीपर सेल तयार आहेत, अशा आशयाचा धमकीचा मेल एनआयएच्या मुंबई शाखेला आला आहे. या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे, असेही या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, तपास यंत्रणा अधिक तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे, धमकी देणाऱ्याने दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही केला आहे. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तुम्ही मला थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा, असा इशारा या मेलमध्ये देण्यात आला आहे. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. या ई-मेलनंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनीही, याप्रकरणी योग्यपणे तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. या मेलची माहिती सर्व यंत्रणांना पाठवण्यात आली आहे.
यापूर्वीही मिळाली होती धमकी... गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरून मिळाली होती. दीपक शर्मा नावाच्या ट्विटर खात्यावरून धमकी देण्यात आली होती. तसेच, जून २०२१ मध्ये २२ वर्षीय सलमान नावाच्या तरुणाने पोलिसांना फोनवरून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला दिल्लीतील खजुरी खास पोलिसांनी अटक केली होती.
राजस्थानमधून आरडीएक्स जप्त राजस्थान पोलिसांनी जयपूरमधून गुरुवारी १२ किलोग्रॅम आरडीएक्स, बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले. साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्याची योजना होती. तर, राजस्थान व मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ सैफुल्ला नावाच्या या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.