पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागितला आहे. काही महिन्यांपूर्वी मोदींनी आपल्या मंत्र्यांना एक कानमंत्र दिला होता, जो त्यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना राबविला होता. यावर मंत्र्यांकडून खुलासा मागविला आहे.
मंत्रालये आणि त्यांच्या विभागांकडून अनेक मुद्द्यांवर उत्तरे मागविण्यात आली आहेत. यामध्ये GeM (सरकारी ई-मार्केट) पोर्टल वापरणे, अधिकाऱ्यांसोबत 'टिफिन' बैठका घेणे आणि केंद्राच्या निर्णयांची सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी करणे यांचा समावेश आहे. मोदींनी मंत्रिपरिषदेमध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि गव्हर्नंस बाबत काही टिप्स दिल्या होत्या, त्यावर काम झालेय का हे मोदींना पहायचे आहे. सरकारचे निरीक्षण आणि फॉलोअपवर मोठे लक्ष आहे. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचा पाठपुरावा केला जातोय की नाही हे मोदी स्वत: पाहत आहेत. आम्ही सर्व विभागांना तपशील पाठवला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 'टिफिन मीटिंग'चा मार्ग काढला होता. अधिकारी आपापल्या टिफीनसह या बैठकांना येत असत आणि जेवणाबरोबरच आपले विचारही मांडत असत, जे काम करताना बोलले जात नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी मंत्र्यांना केंद्रातही अशी संस्कृती विकसित करावी, असा सल्ला दिला होता. टीम विकसित करणे आणि बाँडिंग मजबूत करणे हा यामागचा हेतू होता.
मंत्री आणि त्यांच्या विभागांना जिओटॅगिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंचे गहाळ होणे आणि भ्रष्टाचार कमी करण्यास सांगण्यात आले होते. महिन्यातून एकदा तरी संबंधितांसोबत बैठका घेण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या होत्या. तक्रार निवारण यंत्रणेचा तपशीलही मंत्र्यांकडून मागवण्यात आला आहे.