झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. मात्र, धीरज हे कोणत्याही राजकीय कृतीमुळे नाही तर त्याच्या काळ्या पैशाच्या कमाईमुळे चर्चेत आहे. धीरज साहू यांच्या घरावर छापेमारी करताना आयकर विभागाने आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून नोटांची मोजणी सुरू आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपाने ट्विटवर शेअर केलेला एक व्हिडीओ मोदींनी रिट्विट केला आहे. यासोबत "भारतात Money Heist कल्पनेची काय गरज आहे, जेव्हा तुमच्याकडे काँग्रेस पक्ष आहे, ज्यांचं Heist 70 वर्षांपासून प्रसिद्ध आहे" असं म्हटलं आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई मंगळवारी पूर्ण झाली.
सहा दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील धीरज साहूच्या 9 ठिकाणांवर छापे टाकून त्यांची झडती घेण्यात आली होती. या छाप्यात एकूण 351 कोटी रुपये सापडले आहेत. ही कारवाई विक्रमी ठरली असून कोणत्याही एजन्सीच्या एका कारवाईत आतापर्यंतची सर्वाधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने या छाप्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला दिली आहे. आता यावर ईडीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
बलांगीर आणि तितलागड येथून 310 कोटी रुपयांची रोकड सापडली. बलांगीर आणि तितलागढमधील दारूच्या भट्ट्यांमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 6 डिसेंबरपासून छापेमारीची कारवाई सुरू झाली. अधिकाऱ्यांनी एकूण 176 बॅगांमध्ये रोकड ठेवली होती. आयकर आणि विविध बँकांच्या सुमारे 80 अधिकाऱ्यांच्या नऊ पथकांनी पैशांची मोजणी केली.