नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत घेतली होती. पक्षाची रणनीती आणि प्रचारसभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी अर्ध्या रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांना फोन करत असत. यावरुन नरेंद्र मोदी निवडणूक जिंकण्यासाठी किती प्रयत्नशील होते याचा अंदाज लावला जाऊ शकतो. दोन्ही निवडणुका जिंकल्यानंतर बुधवारी पार पडलेल्या संसदीय समितीच्या बैठकीत स्वत: अमित शहा यांनी हा खुलासा केला. नरेंद्र मोदी यांच्याआधी अमित शाह यांनी खासदारांना संबोधित करत गुजरात आणि हिमालच प्रदेश निवडणुकांसाठी मोदींनी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 'नरेंद्र मोदी अनेकदा रात्री 2 वाजता आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता फोन करत असत. मला समजायचं नाही हे नेमके झोपतात तरी कधी'.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाला उभं करण्यासाठी भाजपा नेत्यांनी केलेल्या संघर्ष आणि योगदानावर बोलताना भावूक झालेले पहायला मिळालं. भाजपा नेत्यांचा उल्लेख करताना किमान तीन वेळा तरी त्यांना आपले अश्रू आवरताना पाहण्यात आलं. 'इंदिरा गांधींच्या वेळी काँग्रेस पक्ष यशाच्या शिखरावर होता, 18 राज्यात त्यांचं सरकार होतं. आज 19 राज्यात भाजपाचं सरकार आहे. येणा-या दिवसांमध्ये इतर राज्यातही भाजपाचं सरकार असेल', असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पक्ष खासदारांनी संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'इंदिरांच्या वेळी 18 राज्यात काँग्रेस सरकार होतं, पण भाजपा आणि त्यांच्या सहका-यांनी फक्त साडे तीन वर्षात 19 राज्यात सरकार स्थापन केलं आहे. लवकरच इतर राज्यातही विजयाचा झेंडा फडकवू'. बैठकीत उपस्थित एका ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरांच्या वेळच्या काँग्रेसचा उल्लेख करणं महत्वपुर्ण असल्याचं सांगितलं. भाजपाने काँग्रेसला फक्त सत्तेतून हटवलं नाही, तर अनेक प्रादेशिक पक्षांनाही धूळ चारली आहे.
आपल्यापेक्षा 14 वर्ष लहान असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावनिक झाले. अमित शहा यांना राष्ट्रीय नेता म्हणून तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षबांधणीसाठी तरुण नेत्यांना संधी दिली पाहिजे असंही ते बोलले. 'गुजरातमध्ये भाजपा आणि संघाच्या अनेक नेत्यांनी मेहनत केली आणि काँग्रेसविरोधात आपला संघर्ष कायम ठेवला. आज त्या सर्वांची आठवण येत आहे जे या जगात नाहीत', असं मोदी म्हणाले.
विजयासाठी कठोर मेहनत करा गुजरातमध्ये आपण कसेबसे बहुमत मिळवले आहे. अशीच स्थिती राहिली व काँग्रेस आक्रमक झाली तर 2019 च्या लोकसभा निवडणुका सोप्या जाणार नाहीत, अशा कानपिचक्या देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयासाठी कठोर मेहनत करा असे आवाहन भाजपाच्या खासदारांनी केले.