PM Modi Varanasi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. वाराणसीच्या उमराहा गावात नव्याने बांधलेल्या 'स्वरवेद महामंदिरा'चे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. यासोबतच 'विकासशील भारत संकल्प यात्रा' अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेतही सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी गावातील महिलांशी संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान बचत गटांच्या महिलांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी चंदादेवी नावाच्या महिलेचे उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल कौतुक केले. तसेच, त्या महिलेला सर्वांसमोर निवडणूक लढवण्याची ऑफरही दिली.
वाराणसीमध्ये बचत गटांच्या महिलांशी बोलताना पंतप्रधानांनी एका महिलेला विचारले की, निवडणूक लढवण्याचा विचार नाही का? त्यावर महिलेने निवडणुकीचा विचार करत नसल्याचे उत्तर दिले. तसेच, तुमच्याकडूनच (मोदींकडून) सर्व काही शिकत आहे. तुमच्या समोर उभे राहून भाषण करताना अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली.
राज्य सरकारच्या लखपती योजनेशी संबंधित महिलापीएम मोदींशी संवाद साधताना चंदादेवी नावाच्या महिलेने सांगितले की, ती लखपती महिला कार्यक्रमाशी संबंधित आहे. ‘लखपती महिला कार्यक्रम’ ही मुख्यमंत्री योगी यांची राज्यातील महत्त्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक महिला तीन वर्षात करोडपती बनवण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे.