नवी दिल्ली - विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी एकजूट राहावे तसेच देशाला कमकुवत करण्याचा आणि देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.
'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा मला सर्वात प्रेरणादायी वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये गुरुवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. मोदी व अन्य मान्यवरांनी नेताजींना आदरांजली अर्पण केली.
सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कटक शहरात आयोजिलेल्या ‘पराक्रम दिन’ या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले.
‘अस्थी भारतात आणण्यास मंदिर पुजाऱ्यांचा विरोध नाही’जपानमधील रेंकोजी मंदिरामध्ये असलेल्या नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांचा विरोध नाही, असा दावा नेताजींच्या कुटुंबीयांनी केला आहे.सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी सांगितले की, नेताजींच्या अस्थी जपानमधील रेंकोजी मंदिरातून भारतात आणण्यात याव्यात या मागणीसाठी नेताजींच्या कन्या प्रा. अनित बोस फाफ यांनी केंद्र सरकारला काही पत्रे लिहिली.त्याला केंद्र सरकारने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. रेंकोजी मंदिरातील अस्थी भारतात आणाव्या, त्यांची डीएनए चाचणी करावी, असे मत याआधी अनेकांनी व्यक्त केले आहे.