पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर रोजी आपला लोकसभा मतदारसंघ काशीचा दौरा करणार आहेत. यावेळी सुमारे 20 किलोमीटर लांबीचा रोड शो प्रस्तावित आहे. रोड शो दरम्यान, भाजपा कार्यकर्ते ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करणार आहेत, ज्यासाठी तब्बल 25 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्या मागवण्यात आल्या आहेत. 17 रोजी नमो घाटावर आयोजित काशी तमिळ संगमच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
17 आणि 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमध्ये जवळपास 25 तास असणार आहेत. पहिल्या दिवशी 17 डिसेंबर रोजी रोड शो होणार आहे. यासोबतच भारत संकल्प यात्रा प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. यानंतर मोदी लोकांशी संवाद साधतील आणि अभिप्रायही घेतील. काशी-तमिळ संगमच्या उद्घाटन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत. यानंतर स्वर्वेद मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत.
वाराणसीतील विश्वनाथ धामच्या लोकार्पणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त येथे विविध भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण धाम दिव्यांनी उजळून निघाला होता. काही ठिकाणी दिव्यांची सजावट मंदिरांमध्ये वेगळेच वातावरण निर्माण करत होती. गंगेच्या काठापासून संपूर्ण मंदिर चौक आणि त्यानंतर मंदिर परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 डिसेंबर 2021 रोजी विश्वनाथ कॉरिडॉर धामचे लोकार्पण केले होते. या काळात केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड आणि व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. यामध्ये भाजपाशासित राज्यांचे 12 मुख्यमंत्री आणि 9 उपमुख्यमंत्री वाराणसीला पोहोचले होते.