लखनऊ - लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. मोदी सरकार रविवारी या योजनेचा पहिला हफ्ता देणार आहे. गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकवर देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक आहे. या योजनेंवर 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार कोटी रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जारी करणार आहेत. ही रक्कम छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. भाजपाचे खासदार आणि किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी असल्याचं सांगितलं आहे. ही योजना शेतकऱ्यांना लागू करण्यासाठी तळागाळापर्यंत काम पूर्ण झालं आहे.यूपीतले भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष राजा वर्मा म्हणाले, शेतकऱ्यांसाठी ही पहिली योजना आहे. जी देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. फक्त उत्तर प्रदेशातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मोदी सरकारनं तेलंगणा सरकारच्या रेत बंधू योजनेपासून प्रेरणा घेत ही योजना राबवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केसीआर सरकार योजनेंतर्गत प्रति एकर शेतकरी असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत पाच हजार रुपयांची रक्कम देते.
12 कोटी शेतकऱ्यांना 25,000 कोटी रुपये देणार मोदी सरकार; तेही फक्त एक क्लिक करून!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:44 AM