नवी दिल्ली - आता आपल्याला राजधानी दिल्लीत ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनमधून लवकरच सफर करता येणार आहे. ही मेट्रेसेवा 37 किलोमीटर लांब असलेल्या मजेंटा लाईनवर (magenta line) जनकपुरी वेस्टपासून ते बॉटनिकल गार्डनपर्यंत धावेल. ही देशातील पहिलीच ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबरला या मेट्रो ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतील. याच बरोबर एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डदेखील लॉन्च केले जाईल.
याच्या यशस्वी प्रयत्नानंतर, इतर मार्गांवरही अशी मेट्रो चालवण्यासंदर्भात DMRCकडून विचार केला जाईल. या ड्रायव्हरलेस ट्रेनसाठी हाय टेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही ट्रेन लवकरच ड्रायव्हर शिवाय पटरीवर धावेल.
DMRCच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्येच मजेंटा लाईनची सुरुवात ड्रायव्हर लेस टेक्निकच्या ट्रेन्ससोबत झाली होती. मात्र, आतापर्यंत ड्रायव्हरच्या मदतीनेच ट्रेन ऑपरेट केल्या गेल्या. आतापर्यंत ड्रायव्हरच ट्रेन स्टार्ट करत होते. यानंतर ट्रेन सी. बी. टी. सी. तंत्रज्ञानानेच चालत राहिल्या.
दिल्ली मेट्रोने 25 डिसेंबर, 2002 रोजी आपल्या कमर्शियल ऑपरेशन्सला सुरुवात केली होती. याच्या एक दिवस आधीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी डीएमआरसीच्या शाहदरापासून तीस हजारीपर्यंत 8.2 किलोमीटर लांबीच्या पहिल्या भागाचे उद्घाटन केले होते. या मार्गावर केवळ सहा स्टेशन्स होते. आता डीएमआरसीकडे 242 स्टेशन्सबरोबरच 10 लाईन आहेत आणि रोज दिल्ली मेट्रोमध्ये सरासरी 26 लाखहून अधिक प्रवासी प्रवास करतात.