नवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाखाली काहींनी दुकानदारी सुरू केल्याचा दावा केल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विश्व हिंदू परिषदेने मोदी यांच्यावर हल्ला चढविला आहे. या वक्तव्याबद्दल लोक मोदींना सोडणार नाहीत आणि २0१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असेही या हिंदुत्ववादी संघटनेने म्हटले. मोदींनी गोरक्षकांच्या भावना दुखावल्या असून, आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असे विहिंपच्या ब्रज विभागाचे उपाध्यक्ष सुनील पाराशर यांनी सांगितले. पाराशर हे माजी ब्रज प्रांत गोरक्षकप्रमुख आहेत. गायींना वाचविण्यासाठी गोरक्षक प्राण पणाला लावत आहेत आणि मोदीजी म्हणतात, ते सर्व गुंडे आहेत, दुकानदारी करीत आहेत. हे अत्यंत चूक आहे. विश्व हिंदू परिषद या विधानाचा धिक्कार करते, असेही ते म्हणाले. गोमातेच्या रक्षणासाठी काम करणारी विश्व हिंदू परिषद ही एकमेव संघटना असल्याचा दावा करून पाराशर म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी सरकारने सर्व्हे करावा. पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण वागणे थांबवा, अन्यथा त्यांना केंद्रातील खुर्ची गमवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. वाजपेयी यांचे केंद्रातील सरकार १९४७ नंतरचे सर्वोत्कृष्ट सरकार ठरले. तथापि, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे ते पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाहीत. पंतप्रधान मोदीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असून, त्यांनाही २०१९च्या निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल, असा दावा पाराशर यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नरेंद्र मोदींना किंमत मोजावी लागेल!
By admin | Published: August 09, 2016 3:21 AM