नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाच्या विकासात अडथळे ठरणारी दोन मोठी आव्हाने आहेत. ती केवळ राजकारणाच्या परिघापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत. या दोन्ही दुष्प्रवृत्तींबाबत लोकांनी द्वेषभावना जागृत करावी आणि येत्या २५ वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला यावे यासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला. विकसित राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना मूठमाती द्यावी लागेल, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच विकासाच्या मार्गावर गतिमान प्रवास करायचा असेल पाच सूत्रे (पंचप्राण) देशवासीयांनी अवलंबायला हवीत, असेही पंतप्रधान म्हणाले.
विकसित भारतासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेत असलेल्या आपल्या एकतेची जपणूक आणि नागरिक म्हणून - यात पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचाही समावेश - आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही पंचसूत्री मोदी यांनी देशवासीयांना दिली.
स्वदेशी बनावटीच्या तोफांनी सलामीपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्यावेळी रिवाजाप्रमाणे २१ तोफांची सलामी देण्यात आली. मात्र, यंदा ही सलामी स्वदेशी बनावटीच्या तोफांची होती. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या तोफांचे नाव ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) असे आहे.
जय अनुसंधान...पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये विविध क्षेत्रातील मूळ संशोधनाच्या गरजेवर अधिक भर दिला. जय जवान, जय किसान, जय विज्ञानबरोबरच आता ‘जय अनुसंधान’ असे म्हणायला हवे, असे मोदी यांनी नमूद केले.
‘नारीशक्तीचा सन्मान करा’देशातील महिलाशक्तीबद्दलही मोदींनी गौरवोद्गार काढले. प्रत्येक स्त्रीचा मान राखला जायला हवा, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी, असे सांगत नारीशक्तीचा सन्मान करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत देशाच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग आपण पाहिले. यातूनही देशवासीयांनी मोठी कामगिरी केली. कधीच हार मानली नाही. संकल्प डळमळू दिले नाहीत. हीच भारताची खरी ताकद आहे. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे आपण पूर्ण करू तेव्हा याच इच्छाशक्तीच्या बळावर विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान