नवी दिल्ली – भारतात झालेल्या २ दिवसीय G20 शिखर संमेलनाची यशस्वी सांगता झाली. परदेशी नेते भारताचा पाहुणचार पाहून खुश झाले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) पासून वर्ल्ड बँकसह अनेक जागतिक संस्थांनी मान्य केले आहे. जी-२० मध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावाला एका पाठोपाठ एका सदस्य देशांनी होकार दिला. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ड्रीमवरही संमेलनात शिक्कामोर्तब करण्यात आले.
२०४७ पर्यंत भारत बनेल विकसित देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन इकोनॉमीबाबत स्वप्न पाहिले आहे. ज्याचा उल्लेख ते स्वत: आणि त्यांचे सहकारी मंत्री अनेकदा करतात. २०४७ पर्यंत भारताला जगातील विकसित देशांच्या यादीत पोहचवायचे आहे. त्याचसोबत पुढील ५-६ वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताला समोर आणायचे आहे. सध्या अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. जागतिक संस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नावर सकारात्मक उत्तर दिले आहे.
G-20 देशात सहभागी होण्यासाठी आलेल्या देशातील IMF च्या डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय मूळ गीता गोपीनाथ यांनी म्हटलंय की, ग्लोबल ग्रोथ इंजिनच्या रुपात भारताची भूमिका नाकारली जाऊ शकत नाही. २०२७-२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. पुढील काळात भारताचे ग्लोबल डेवलपमेंट महत्त्वाची भूमिका निभावेल. जागतिक विकासात भारताचे योगदान १५ टक्क्यांपर्यंत पोहचेल. परंतु हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना लेबर मार्केटमध्ये सुधारणा, उद्योग करण्यासाठी सुलभता, शैक्षणिक गुणवत्ता, महिला सशक्तीकरण यावर विशेष जोर द्यावा लागेल असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत भारताबाबत जे आकडे समोर येत आहेत त्यावर त्यांच्या विश्वासार्हतेवर शंकेचे कारण नाही. भारताची अर्थव्यवस्था समाधानकारकरित्या पुढे जात आहे. चालू आर्थिक वर्षात ६ टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज असून वाढीचा उच्च स्तर राखण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहे. भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार याआधीच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, भारत २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीसारख्या देशांना मागे टाकत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकते. २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावर होती. जी आज पाचव्या स्थानावर पोहचली आहे. कोरोना काळात जेव्हा जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने उभारी घेत वेग पकडला होता.