नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस (Corona Vacciantion) देण्याची घोषणा केली. पण, आता एम्सचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि अॅन्टी-कोरोनाव्हायरस लस कोवॅक्सिनच्या प्रौढ आणि मुलांच्या चाचणीचे प्रमुख निरीक्षक डॉ. संजय के राय यांनी केंद्राचा हा निर्णय अवैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे. डॉ.संजय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
हा निर्णय लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने ज्या देशांनी आपल्या देशात बालकांचे लसीकरण सुरू केले आहे, त्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण करायला हवे होते, असे मत राय यांनी व्यक्त केले आहे. देशासाठी निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे. पण, मुलांचे लसीकरण करण्याच्या त्यांच्या अवैज्ञानिक निर्णयाने माझी निराशा झाली आहे. संजय राय यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही (पीएमओ) टॅग केले.
मुलांच्या लसीकरणामुळे नुकसान होणार
ते पुढे म्हणाले की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा वेग अतिशय कमी आहे. आकडेवारीनुसार, प्रत्येक 10 लाख कोरोनाग्रस्त मुलांमध्ये फक्त दोघांचा मृत्यू होत आहे. ही सर्व आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, मुलांना लसीकरणाची गरज वाटत नाही. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात. ज्या कारणामुळे मुलांचे लसीकरण सुरू केले आहे, त्याचा फायदा होणार नाही.
लसीकरणाचा संसर्गावर परिणाम नाहीडॉ.संजय पुढे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे किंवा रोगाची तीव्रता रोखणे किंवा मृत्यूची प्रकरणे रोखणे हा लसीकरणाचा उद्देश आहे. परंतु या प्राणघातक साथीच्या लसींबद्दल आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती अशी आहे की, लसींचा विषाणूवर विशेष परिणाम होऊ शकलेला नाही. काही देशांमध्ये अँटी-कोरोनाव्हायरस लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतरही लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून येत आहे.
तीव्रता कमी करण्यासाठी लस प्रभावी
ते पुढे म्हणाले, यूकेमध्ये दररोज 50 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. यावरून हे सिद्ध होते की लस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाहीत, परंतु या संसर्गाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. प्रौढ लोकसंख्येमध्ये कोविड मृत्यू दर 1.5 टक्के आहे. याचा अर्थ संसर्गाच्या 10 लाख प्रकरणांमध्ये सुमारे 15 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. लसीकरणाद्वारे हा आकडा आणखी कमी करता येऊ शकतो, असे ते म्हणाले.