नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे. सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं. न्यायपालिका त्यांच्या समस्यांचं समाधान काढण्यासाठी एकत्र बसेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.
भारतीय न्यायपालिकेचा एक उज्जव काळ होता, ही न्यायपालिका सक्षम लोकांनी परिपूर्ण आहे. हीच न्यायपालिका एकत्र बसेल आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करेल. आपल्या न्याय प्रणालीवर माझा विश्वास असून ते निश्चितपणे या वादावर तोडगा काढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचा कारभार सुरळीत होत नसल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर सुप्रीम कोर्टातील वाद चव्हाट्यावर आला. याच मुद्द्यावर मोदींनी मतं मांडली. 'मला वाटत सुप्रीम कोर्टाच्या वादावरील चर्चेपासून मला लांब रहायला हवं, सरकारलाही यापासून लांब राहायला हवं. तसंच राजकीय पक्षांनीही यापासून दूर राहावं, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर निशाणा साधण्याची तसंच भाजपाच्या हाय प्रोफाइल नेत्यांना संकटात टाकण्याचे विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. याप्रश्नावरही मोदींनी उत्तर दिलं. राजकीय दृष्टीने मला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले. मी आता जेथे आहे, तेथे पोहचण्यासाठी त्यांचीच मला मदत झाली, अशी टीका मोदींनी विरोधकांचं नाव न घेता केली.
दरम्यान, 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्या. जे चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकून आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचं कामकाज योग्यरित्या चालत नसल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर या चार न्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही टीका केली होती.