नवी दिल्ली : देशात मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदभार स्वीकारला आहे. तसेच, सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात परराष्ट्र धोरणावर अधिक भर असणार असल्याचे दिसते. कारण, यासंदर्भातील झलक त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात ७ देशांच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावून दाखवली.
नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या देशातून विदेश दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूतानमधून विदेश दौऱ्याला सुरुवात केली होती. तर २०१९ मध्ये त्यांनी मालदीवमधून विदेश दौऱ्याला सुरुवात केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विदेश दौरा इटलीतून सुरू होऊ शकतो. कारण इटलीत होणाऱ्या जी-७ परिषदेत ते सहभागी होतील.
इटलीतील बोर्गो एग्नाझिया (फासानो) येथे १३ ते १५ जून दरम्यान जी-७ शिखर परिषद होणार आहे. नरेंद्र मोदी १४ जून रोजी एका दिवसासाठी या परिषदेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मार्च २०२३ मध्ये इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी नवी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान इटली आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, जी-७ शिखर परिषद एक अनौपचारिक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे. या परिषदेचे सदस्य देश इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, यूके आणि अमेरिका आहेत. इटलीला या वर्षी १ जानेवारीला जी-७ शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. जी-७ शिखर परिषदेनंतर स्वित्झर्लंड युक्रेन शांतता शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे, ज्यामध्ये ९० देश आणि संस्था (निम्मे युरोपमधील) सहभागी होतील. युक्रेनमध्ये संभाव्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे देश सहभागी होतील. मात्र, भारत या परिषदेमध्ये सहभागी होणार नसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.