रुद्रप्रयाग - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीकेदारनाथ आणि बद्रीनाथाची धार्मिक यात्रा करण्यासाठी गेले आहेत. शनिवारी केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी मोदी गुहेच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, केदारनाथमध्ये नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा मी इथे आलेलो. गुजरातमध्ये असतानाही केदारनाथसाठी कायतरी केलं पाहिजे अशी इच्छा होती. सुदैवाने पंतप्रधान झाल्यानंतर मला ही संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनविला आहे. त्यावर काम सुरु आहे. केदारनाथ भूमीशी माझं विशेष नाते आहे. मी देवाच्या चरणी येतो तेव्हा कधीच काही मागत नाही.
केदारनाथला येण्यासाठी अनेक वर्षापासून मला संधी मिळते. पंतप्रधान झाल्यापासून केदारनाथला येण्यासाठी वारंवार योग येतो. उत्तराखंडात आलेला नैसर्गिक प्रलयामुळे खूप नुकसान झालं तेव्हा मी याठिकाणी आलो होतो त्यावेळपासून मनात केदारनाथसाठी कायतरी केलं पाहिजे अशी इच्छा होती. गुजरातमध्ये असतानाही आपल्यापरिने करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथे काम करण्यासाठी 3 ते 4 महिने मिळतात. बाकीच्यावेळी बर्फवृष्टीमुळे तापमान कमी होतं असं मोदींनी सांगितले.
तसेच केदारनाथमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मी आहे. दोन दिवसांतील एक दिवस गुंफेत राहण्यात गेला. एकांतपणा खूप दिवसांनंतर मिळाला. माझं विकासाचं जे स्वप्न आहे ते पर्यावरणाशी जोडलेले आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती.नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली. त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला.