स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरून केंद्र सरकारला घेरल्यापासून ओवेसी चर्चेत आहेत. आता ओवेसी यांनी एलएसीजवळच्या भूभागावर चीनने केलेल्या कब्ज्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनच्या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी गप्प का आहेत? याचं कारण शी जिनपिंग यांच्यासोबतची मैत्री तर नाही ना? असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे. यावेळी नूंह येथील हिंसाचारावरूनही ओवेसींनी भाजपावर टीका केली.
ओवेसी म्हणाले की, हॉट स्प्रिंगवर चिनची फौज बसलेली आहे. त्याचं कारण शी जिनपिंग यांच्यासोबत असलेली मैत्री तर नाही ना? सरकार या प्रकरणावर मौन बाळगून आहे. भारताच्या इतिहासाबाबत तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार आहात. नूंहमध्ये ७५० मुस्लिमांची घरं तोडली आहेत. मुस्लिमांवर बुलडोझर चालवला जात आहे. भाजपाने गेल्या ९ वर्षांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ओवेसी पुढे म्हणाले की, भाजपाचे पंतप्रधान ना चीनवर बोलतात. ना नूंहवर बोलतात. येथे एखा दिवसात हजारो लोकांना बेघर करण्यात आलं. पंतप्रधानांनी नूंहच्या घटनेवर बोललं पाहिजे. पंतप्रधान मोदी उद्या लाल किल्ल्यावरून हिंसाचाराचं खंडन करतील? एका समुदायाविरोधात हल्ला करणारे कोण लोक आहेत हे सांगतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एलएसीच्या मुद्द्यावर ओवेसी म्हणाले की, लडाखमध्ये अनेक पॉईंटवर आम्ही जाऊ शकत नाही आहोत. आजसुद्धा चीनची फौज तिथे बसली आहे. सरकारला नेमकं काय लपवायचं आहे? कुठे आम्ही करार केला तर जमीन गमावू. आम्हाला २६ पॉईंटवर पेट्रोलिंग करता येत नाही आहे, असे लष्कराने स्वत: सांगितले आहे.