मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. भारतीय सीमारेषेवर जाऊन आपल्या खास शैलीत विरोधी राष्ट्रांना ठणकावत असतात. भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवत जवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, त्यांच्या कणखरपणाच्या पाठिशी संपूर्ण देश असल्याचा विश्वास देतात. आता, मोदींनी चक्क तेजस या फायटर जेटमधून सफर केली आहे. तेजस सफरचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत देशावासीयांचे अभिनंदनही केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच थ्रीलींग अनुभव घेत असतात. कधी जंगलात जाऊन भ्रमंती करतात, तर कधी समुद्रात बोट सफारीचाही अनुभव घेतात. आता, थेट तेजस फायटर जेट चालवून मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय, भारतीय सैन्य दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या फायटर जेटची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफर केली. मोदी बंगळुरूच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमटेड (HAL) येथे पोहोचले होते. येथील मॅन्युफॅक्चरींग हबची त्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणही भरलं.
मोदींनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना, हा अनुभव अविश्वसनीय असा होता. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी बळावला आहे. देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान वाटत असून नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन... असे म्हणत मोदींनी तेजस जेट उड्डाणानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. तर, डीआरडीओ, वायूदल आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.
तेजस हे युद्धात शत्रुवर जोरकसपणे तुटून पडणारं फायटर जेट आहे. वायूसेनेच्या लढाऊ विमानांमधील अत्याधुनिक जेट असलेल्या फायटरची सफर अनुभवत मोदींनी आनंद व्यक्त केला. आपल्या जवानांसाठी असलेलं लढाऊ विमान स्वत: मोदीजींनी चालवून पाहिलं.