नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला रुद्राभिषेक करत गुहेत ध्यानधारणा केली. केदारनाथपाठोपाठ बद्रीनाथाच्या चरणीही पंतप्रधानांनी डोके टेकले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे असा आरोप करत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
या पत्रामध्ये तृणमूल काँग्रेसने लिहिलं आहे की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत मात्र या यात्रेला मिडीयाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे असं लिहिण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये नऊ लोकसभा जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण लागले होते. हिंसाचार झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून बंगालमधील प्रचार एकदिवस आधी संपविण्याचा निर्णय घेतला होता. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हिंसा केल्याचा आरोप भाजपाने केला होता. या राड्यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष्य लागले होते.
शनिवारी सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती.नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली. त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला. त्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी पोहचले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथाची धार्मिक यात्रा करण्यासाठी गेले आहेत. शनिवारी केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील गुंफेत ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी मोदी गुंफेच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला.