नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील दोन महान नेत्यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये, बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारत रत्न सन्मान जाहीर झाला. आता, देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांच्या नावांची मोदींनी घोषणा केली असून त्यामध्ये, डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांनाही भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देशातील या ३ भूमिपुत्रांना भारत रत्न देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
डॉ. एम.एस स्वामीनाथन
डॉ. एमएस स्वामीनाथ यांनी देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातील कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मोठा विकास घडवून आणण्यात त्यांच योगदान आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित करण्यास मदत झाली. डॉ. स्वामीनाथन यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून नेहमीच डॉ. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली जाते.
चौधरी चरण सिंह
चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री बनून त्यांनी देशासाठी काम केलं. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केल्याचं पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटलं आहे.
पी.व्ही.नरसिंह राव
एक विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर देशाची सेवा केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे खासदार व आमदार बनून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदृष्टी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले.
नरसिंह राव गरू यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ देशाला पुढे घेऊन गेला. त्यांच्याच कार्यकाळात भारत जागतिक बाजारपेठांसाठी खुला झाला आणि आर्थिक विकासाच्या नव्या युगाला चालना मिळाली. याशिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अधोरेखित करते. राव यांनी भारताला केवळ गंभीर परिवर्तनच घडवले नसून देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला.