नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपतींना सज्जड दम भरला आहे. देश सोडून पळालेल्या सर्व पळपुट्या कर्जबुडव्यांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही उद्योगपतीचं थेट नाव घेणं टाळलं. कर्ज बुडवून परदेशात पळालेल्यांसमोर भारतात परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असंही मोदी म्हणाले. ते कर्ज प्रवाह आणि आर्थिक वाढीवर आजोयित एका चर्चेला संबोधित करत होते.
"पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीरबाबींचा अवलंब करत आहोत आणि लवकरच त्यात यशही येईल. त्यांना माझा एकच आणि स्पष्ट संदेश आहे की भारतात परत या कारण तुम्हाला परत आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. ते काही थांबणार नाहीत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदींना इशारापंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उद्योगपतींच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या पळपुट्या उद्योगपतींकडे होता. आतापर्यंत चुकीचं काम केलेल्यांकडून ५ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
बँका अधिक सक्षम होणारकेंद्रात २०१४ साली भाजपाचं सरकार आल्यानंतर बँका अधिक सक्षम झाल्याचा दावा मोदींनी यावेळी केला आहे. "देशाच्या अर्थव्यवस्थाला नवी ऊर्जा देण्यासाठी बँका आता मजबूत स्थितीत काम करत आहेत. यामुळे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी खूप मदत होणार आहे", असं मोदी म्हणाले. बँकांनी आता स्वत:सोबतच देशाचं ताळेबंद खात्यांची स्थिती सुधारण्यासाठी सक्रियतेनं काम करायला हवं असंही मोदी म्हणाले.
बँकांना दिला मोलाचा सल्लाबँकांनी आपलं क्षेत्र विस्तार करण्यासाठी आता जुन्हाय संस्कृतीचा त्याग करुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीच्या दृष्टीकोनात सकारात्मक पद्धतीनं विचार करायला हवा. बँकांनी व्यावसायिक जगतासोबतच भागीदारी मॉडेलवरही काम करायला हवं असा सल्ला मोदींनी बँकांना दिला आहे.
बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचावंबँकांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं. ग्राहकांनी बँकेत येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं, असंही मोदी म्हणाले.