'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरातून होणारी टीका सहन करून शिवसेना उभी केली, सारे आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केले. त्यांच्या त्यागाबद्दल, संकल्पशक्तीबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी, प्रेमापोटी मी शिवसेनेविरोधात चकार शब्दही काढणार नाही’... हे उद्गार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. सांगलीतील तासगाव इथं झालेल्या निवडणूक प्रचारसभेतले. सेनेचे प्रमुख नेते भाजपावर टीकास्त्र सोडत होते, युती तोडल्याचं खापर मोदी-शहांवर फोडत होते. पण मोदींनी चतुराई दाखवत आपल्या या 'मित्रा'वर कुरघोडी केली होती. बाळासाहेबांचा गौरव करून त्यांनी अगदी शिवसैनिकांचीही मनं जिंकली होती आणि त्याचा चांगलाच राजकीय फायदा भाजपाला झाला होता. चार वर्षांच्या कार्यकाळात, कामाच्या व्यापात मोदी बहुधा हे सगळं विसरले आणि पाच राज्यांच्या निवडणुकीत एक मोठी चूक करून बसले.
आपली जीभ किंवा वाणी हे एक प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. ते योग्य रितीने वापरलं तर आपण अनेक लढाया जिंकू शकतो. पण, त्यात जरा जरी चूक झाली तरी घात होतो. कारण, तोंडातून गेलेला शब्द मागे घेता येत नाही. त्यामुळे राजकारणात तर कुठे काय बोलायचं याचं भान पदोपदी बाळगायला हवं. वास्तविक, नरेंद्र मोदी अनेक वर्षं हे अस्त्र अचूक वापरतात. मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि त्याची मोठी किंमत भाजपाला मोजावी लागली, असं राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील निकाल पाहून म्हणावं लागेल. तो शब्द होता, विधवा! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख भर सभेत अशा पद्धतीने करणं, तोही मोदींनी, निश्चितच धक्कादायक होतं-आहे.
एकूणच, देशभरात निवडणूक प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. एकमेकांना वाट्टेल ते बोललं जातंय. पण, काही नेते आपली पत-प्रतिष्ठा सांभाळून बोलतात. त्यापैकी मोदीही आहेत. आता 'होते' म्हणावं लागेल. सोनिया आणि राहुल गांधींवर त्यांनी अनेकदा टीका केली, पण तोल सुटला नव्हता. यावेळी मात्र जीभ घसरली आणि तीन राज्यांतली सत्ता गेली. अर्थात, भाजपाच्या अपयशाची बरीच कारणं आहेत. सरकारविरोधी वातावरण असेल, काँग्रेसने केलेला प्रचार असेल, राजस्थानात वसुंधरा राजेंबद्दलची नाराजी असेल किंवा आणखीही बरेच. पण, त्या शब्दानेही घोळ केलाच.
गुजरातच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना 'मौत का सौदागर' म्हटलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण पाहिलंय. मणिशंकर अय्यर यांच्या 'नीच' या शब्दामुळे काय झालं, हेही आपल्याला ठाऊक आहे. हा इतिहास पाहता, विधवा हा उल्लेख निवडणुकीत निर्णायक ठरणारा नसला, तरी तो निकालावर परिणाम करू शकतो, यात काहीच शंका नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं - करताहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूनच देशानं एकदा नव्हे तर दोनदा काँग्रेसकडे सत्ता सोपवली होती. विधवा म्हणून त्यांचा उल्लेख केल्यानं मोठा वर्ग दुखावला जाणं स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी मोदींना निश्चित टाळता आली असती.
अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे सुटलेला शब्द परत घेता येणार नाही. पण, यापुढे काळजी नक्कीच घेता येईल. प्रथेप्रमाणे भाजपा पराभवाचं चिंतन करेलच. तेव्हा, अशा चुका टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही विचार केल्यास ते त्यांच्याच हिताचं ठरेल. कारण, संत तुकाराम महाराजांनीच सांगून ठेवलंय, घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||