पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सायंकाळी बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना फोन केला होता. यावेळी मोदी यांनी लालू प्रसाद यादवांच्या प्रकृतीची विचारणा केली. तसेच लालू प्रसाद लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केला आहे. लालू यादव दोन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.
लालू प्रसाद यादव हे ३ जुलैच्या सायंकाळी पायऱ्यांवरून खाली पडल्याचे वृत्त आले होते. त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुत्रांनुसार लालू यांच्या खांद्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना दोन महिने बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे.
लालू हे राबडीदेवी यांच्या सरकारी निवासस्थानी राहतात. मंगळवारी म्हणजे आजच राजदचा स्थापना दिवस होता. या दिवशी लालू यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने काही भावनिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये लालू हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसत आहेत. ते खूप क्षीण आणि आजारी वाटत आहेत. वडील आमच्यासाठी हिरोसारखे आहेत, ते लवकर बरे व्हावेत, असे रोहिणी यांनी म्हटले आहे.
लालू प्रसाद यांच्या तब्येतीची आज डॉक्टरांच्या एका पथकाने तपासणी केली आहे. त्यांच्यानुसार लालू यांची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारणा होत आहे. त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.