नवी दिल्ली - देशपातळीवर होत असलेली विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी यांचा फटका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. तसेच मतदारांच्या नाराजीमुळे भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट होण्याची चिन्हे आहे. 2014 साली स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी मात्र स्वबळावर बहुमत मिळवता येणार नाही. मात्र असे असले तरी भारतीय जनता पक्ष एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर केंद्रात सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाप्रणित एनडीएला सद्यस्थितीत 274 जागा मिळतील, असा हा सर्व्हे म्हणतो. तर काँग्रेस प्रणित यूपीएला 164 आणि इतरांना 105 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने 19 राज्यांमध्ये केलेल्या या सर्व्हेनुसार लोकसभेमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला 274 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 164 एवढ्या जागा मिळतील. इतर पक्षांना 105 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास एनडीएला 37 टक्के, यूपीएला 31 टक्के आणि इतरांना 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात भाजपाला मोठा धक्का उत्तर भारतात विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथील लोकसभेच्या 151 जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 86 ते 94, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला 23 ते 27 आणि इतरांना 33 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 साली उत्तर भारतात एनडीएला तब्बल 134 जागा मिळाल्या होत्या. तर यूपीएला 8 आणि इतरांना केवळ 9 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम आणि मध्य भारतातही भाजपाला नुकसान पश्चिम आणि मध्य भारतात लोकसभेच्या 118 जागा असून, येथे आज मतदान झाल्यास भाजपाला मोठा धक्का बसू शकतो. येथील 118 जागांपैकी भाजपा प्रणित एनडीएला 70 ते 78, काँग्रेस प्रणित यूपीएला 41 ते 47 जागा आणि इतरांना शून्य ते दोन जागा मिळू शकतात. 2014 साली भाजपाप्रणित एनडीएला 108 आणि काँग्रेसप्रणित यूपीएला 10 जागा मिळाल्या होत्या. दक्षिण भारतात यूपीएला आघाडी या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए दक्षिण भारताही जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताती सहा राज्यांमधील लोकसभेच्या 132 जागांपैकी केवळ 18 ते 22 जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला मोठा फायदा होणार असून, त्यांना 65 ते 75 जागा मिळतील. तर अन्य पक्षांना 38 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात मात्र भाजपाला फायदापूर्व भारतात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना फायदा होताना दिसत आहे. पूर्व भारतातील 142 जागांपैकी भाजपा प्रणित एनडीएला 86 ते 94 जागा आणि काँग्रेस प्रणित यूपीएला 22 ते 26 जागा आणि इरतांना 26 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या जागा घटणार, पण केंद्रात मोदी सरकार कायम राहणार - सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 8:29 PM