नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक वाक्याला भाजपामध्ये किंमत आहे. पक्षाचे नेते त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. परंतु, मोदींनी केलेली एक टिप्पणी आज राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधानांच्या निवेदनातील वाक्य संसदेच्या रेकॉर्डमधून हटवावं लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह विजयी झाले होते. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावरील भाषणात, काँग्रेसला टोमणा मारताना, नरेंद्र मोदींनी यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांच्या नावावरून कोटी केली होती. ती काढून टाकण्याचे आदेश आज अध्यक्षांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीके हरिप्रसाद यांच्या नावावरून केलेली टिप्पणी आक्षेपार्ह आणि चुकीच्या हेतूने केलेली असल्यानं हे वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी केली होती. तेव्हा, हे वाक्य तपासून निर्णय घेण्याचं आश्वासन अध्यक्षांनी दिलं होतं. त्यानंतर, आज हे वाक्य काढून टाकण्यात आल्याची माहिती राज्यसभा सचिवालयाने दिली. या निर्णयाचं झा यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान, बिजू जनता दलाच्या पाठिंब्यामुळे राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला होता. हरिवंश मूळचे बलियातीली आहेत. ऑगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह 'हरी' कृपेवरच चालणार आहे, अशी शाब्दिक कोटी मोदींनी केली होती. त्यावेळी हरिप्रसाद यांच्या 'बी के' या आद्याक्षरांवरून त्यांनी केलेली टिप्पणी आता कामकाजातून हटवण्यात आलीय.