ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी NCP चं वर्णन नॅचरली करप्ट पार्टी असं करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मात्र, पवारांवर स्तुतीसुमनांची उधळण केली. पवारांच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रतिभा पवार, मनमोहन सिंग, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
सहकार क्षेत्र असो, कृषिक्षेत्र असो वा क्रिकेट असो शरद पवार म्हणजे प्रचंड व्यासंग असं सांगताना मोदींनी तुम्ही फक्त ऊस हा एक शब्द काढा पवार तुम्हाला एक तास ऊसासंदर्भात अद्ययावक माहिती देतील असे गौरवोद्गार काढले. सतत काहीतरी नवीन शिकत राहणं, देशाच्या कृषिक्षेत्रासाठी काय चांगलं आहे याचा अभ्यास करत राहणं, आणि कायम कृषिक्षेत्रासाठी वेळ देणं पवारांनी केल्याचं मोदी म्हणाले.
ज्यावेळी मुंबईवर अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं आणि ही आर्थिक नगरी अंडरवर्ल्डच्या विळख्यात अडकते की काय अशी भीती होती, त्यावेळी शरद पवारांनी मुंबई अंडरवर्ल्डमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावल्याचं मोदी म्हणाले. शेतक-यांना मोसमाचा अंदाज लवकर येतो असं सांगताना राजकीय वातावरणाचा अंदाजही शरद पवारांना इतरांपेक्षा आधी येतो अशी कोपरखळीही मोदींनी पवारांच्या राजकारणाला उद्देशून मारली.
मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:
- कृषि क्षेत्रामध्ये सतत नवीन प्रयोग करण्यावर शरद पवारांचा भर राहिला आहे.
- तुम्ही कधीही शरद पवारांना अवघ्या दहा मिनिटांसाठी जरी भेटलात तरी ते शेतक-यांच्या हिताचा प्रश्न मांडतात.
- शरद पवार एकदा पुण्याला जाताना, आधी गुजरातमध्ये आले आणि त्यांनी मला गुजरातच्या शेतक-यांच्या हिताच्या चार गोष्टी सांगितल्या.
- शरद पवारांचे वडील सहकार क्षेत्राशी तर आई शिक्षण क्षेत्राशी संबंधित होती.
- एक आयुष्य एक ध्येय असं आपण म्हणतो, पण असं वाहून घेणं सोपं नाहीये.
- शरद पवारांचे बारामती हे विकासाचे आदर्श मॉडेल आहे.
- गेल्या पाच दशकाहून अधिक काळ शरद पवारांनी देशाची सेवा केली.
- शरद पवारांचं मी या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.