नवी दिल्ली : आपल्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा केली. नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार असून, या समारंभाचे निमंत्रण ६५00 जणांना देण्यात आले आहे.या दोघांतील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. मात्र, नक्की करण्यात आलेली मंत्र्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी स्वत:च संबंधित खासदारांना फोन करून त्यांच्या मंत्रिपदाची माहिती देणार आहेत, असे कळते. त्यामुळे भाजपसह सर्वच मित्रपक्षांचे बहुसंख्य खासदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. काही जण आज रात्री दिल्लीत दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी यांच्यासह ६0 ते ६५ कॅबिनेट व राज्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेना, जनता दल (युनायटेड), अकाली दल, अपना दल यांचा समावेश आहे. शिवसेना व जनता दलाला दोन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा आहे. त्यापैकी एक राज्यमंत्रिपद असू शकेल. अकाली दल, अपना दल यांना प्रत्येकी एक मंत्रिपद अपेक्षित आहे.तामिळनाडूमधून अण्णा द्रमुकचा एकच खासदार आहे. त्याला मंत्रिपद द्यावे की लोकसभेचे उपाध्यक्षपद द्यावे, यावर विचारविमर्श सुरू असल्याचे कळते. मात्र, ते पद जनता दल (युनायटेड)ला दिले जाईल आणि अण्णा द्रमुकला राज्यमंत्रिपद मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्या राज्यातून भाजपचा एकही उमेदवार लोकसभेवर निवडून आलेला नाही, पण तिथे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या वेळी अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजपला तिथे आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळे अण्णा द्रमुक सोबत असणे भाजपला गरजेचे वाटते.उत्तर प्रदेशबरोबरच कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र या राज्यांना अधिक मंत्रिपदे मिळू शकतील. त्या पाठोपाठ मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यांना प्रतिनिधित्व अपेक्षित आहेत. ईशान्येकडील राज्यांनाही राज्यमंत्रिपदे मिळू शकतील. ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका होऊ न गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना कमी प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा आहे. दक्षिणेकडील कर्नाटकबरोबरच तेलंगणाला खूश ठेवण्याचा प्रयत्न होईल, असे बोलले जाते.या निमंत्रितांमध्ये परदेशी पाहुणे, विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, भाजपसह जवळपास सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, संभाव्य मंत्र्यांचे नातेवाईक, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचा समावेश आहे. यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निमंत्रणे देण्यात आली आहेत. मोदी यांच्या २0१४च्या शपथविधी समारंभाला ५ हजार जणांना बोलावण्यात आले होते.समारंभ संध्याकाळी असल्याने, त्यानंतर भोजनाचाही कार्यक्रम आहे. त्यात भारताच्या सर्व राज्यांची वैशिष्ट्ये असलेले शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ असतील, असे सांगण्यात आले. शपथविधी व नंतरचा भोजन समारंभ यांची जोरदार तयारी राष्ट्रपती भवनात सुरू असून, त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बुधवारी अर्धा दिवस लवकर सोडण्यात आले.>समारंभातील राजकारण व बहिष्कारलोकसभा व त्या आधी पंचायत निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हाणामाºया झाल्या. दोन्ही बाजूंकडील काहींच्या हत्याही झाल्या. भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधी समारंभाची निमंत्रणे देण्यात आली आहेत. असे सुमारे २५ जण कोलकात्याहून रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. हा घटनात्मक कार्यक्रम असून, त्यास हजर राहायलाच हवे. तसे आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सांगितले आहे, असे त्या म्हणाल्या होत्या, पण हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आल्याचे कळताच, त्यांनी आपला निर्णय बदलला. आपण शपथविधीला जाणार नाही, असे सांगताना, अशा समारंभाचा भाजप राजकीय स्वार्थासाठी वापर करीत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला ६,५00 पाहुणे राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:35 AM