नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी उद्या, ७ जूनला दुपारी २ वाजता एनडीएच्या नवनियुक्त खासदारांची बैठक बोलावण्यात आली असून एनडीए राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. यासाठी आधी ८ जून ही तारीख ठरविण्यात आली होती. परंतु, टीडीपीच्या खासदाराने आता शपथविधीची नवीन तारीख सांगितली आहे.
भाजपाला आता टीडीपी आणि जेडीयूच्या सााथीने सत्ता स्थापन करावी लागत आहे. उद्या सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक घेणार आहे. या बैठकीत मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी ८ जून ऐवजी ९ जूनला मोदी शपथ घेतील असे म्हटले आहे.
किंगमेकर ठरलेल्या नितीशकुमार यांनी व इतर घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत. आता मित्रपक्ष म्हणतील ते मंत्रिपद सत्तेत राहण्यासाठी द्यावे लागणार आहे.
सत्तेत मोठा वाटा मिळेपर्यंत नितीशकुमार दिल्लीतर तळ ठोकून असणार आहेत. सुत्रांनुसार नितीशकुमार यांनी मंत्रिपदांच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. यानुसार चार खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जावे. यानुसार जेडीयूचे १२ खासदार आहेत मग नितीशकुमारांना तीन कॅबिनेट मंत्रिपदे हवी आहेत. दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंची टीडीपीने देखील खलबते सुरु केली आहेत. त्यांचे १६ खासदार आहेत. यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपद, रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि अर्थखाते मागण्याची शक्यता आहे. भाजपाला बहुमताचा आकडा पार करता न आल्याने आता या दोघांच्या मागण्यांवर तोडपाणी करावे लागणार आहे.