ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीवरुन दिल्लीत राजकीय रणकंदन सुरु झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी मोदींच्या बीए आणि एमच्या पदव्या सार्वजनिक करुन आम आदमी पक्षावर निशाणा साधला. त्यानंतर लगेच आपने पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींच्या पदव्या खोटयाच असल्याचा आरोप केला आहे.
नरेंद्र मोदींची बीएची उत्तरपत्रिका १९७७ सालची आणि त्यांना पदवी १९७८ साली मिळाल्याचा आरोप केला. मोदींच्या उत्तरपत्रिकेवर नरेंद्रकुमार दामोदारदास मोदी असे नाव आहे तर, पदवीवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे नाव आहे. उत्तरपत्रिका आणि पदवीवरील नावात फेरफार कसा झाला असा सवाल विचारत आपने मोदींची डीग्री खोटी असल्याचा आरोप केला.
मोदींच्या डीग्री दाखवताना फेरफार करण्यात आले देशाची फसवणूक करण्यात आली असा आरोप आपने केला आहे. पंतप्रधान मोदींना वाचवण्यासाठी अमित शहा आणि अरुण जेटली यांनी देशाची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी भाजपने मोदींच्या पदव्या दाखवताना अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. कारण अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या पदव्यांवर शंका उपस्थित केली होती.